पुणे : महाराष्ट्रात यंदाचा, २०२३-२४ चा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या राज्यात साखरेचे उत्पादन १०५ लाख टनांपेक्षा अधिक झाले आहे. राज्यात साखरेचे उत्पादनही गेल्या हंगामापेक्षा जास्त झाले आहे. यंदाच्या गळीत हंगामात एकूण २०७ साखर कारखान्यांनी सहभाग घेतला. यामध्ये १०३ सहकारी आणि १०४ खाजगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत १०३२.९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर २५ मार्चअखेर राज्यात १०५२.९४ लाख क्विंटल (१०५.२९ लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे.
गेल्यावर्षी २११ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला होता आणि १०४८.६४ लाख टन उसाचे गाळप करून १०४५.९७ लाख क्विंटल (१०४.५९ लाख टन) साखरेचे उत्पादन केले होते. महाराष्ट्रात चालू हंगामात केवळ १०६ साखर कारखान्यांनी गाळप थांबवले आहे. तर गेल्या हंगामात २५ मार्चपर्यंत १७७ साखर कारखान्यांनी गाळप थांबवले होते. चालू हंगामात साखरेच्या उताऱ्यात किंचित वाढ दिसून येत आहे.
यंदाच्या हंगामात, मार्चपर्यंत राज्यातील साखरेचा उतारा १०.१९ टक्के होती, तर गेल्या हंगामात या वेळेपर्यंत साखर उतारा ९.९७ टक्के होती. कोल्हापूर विभागात १९, सोलापूर विभागात ३३, पुणे विभागात १२, अहमदनगर विभागात १०, छत्रपती संभाजी नगर विभागात ११ साखर कारखाने, नांदेड विभागात १८ साखर कारखाने आणि अमरावती विभागात ३ साखर कारखाने बंद झाले आहेत.