नवी दिल्ली : महाराष्ट्रातील गळीत हंगाम १ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झाला आहे. मात्र, शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत हंगामाची सुरुवात अतिशय संथ झाली होती. मात्र, आता गाळपाने गती घेतली आहे. त्यामुळेच महाराष्ट्र ऊस गाळप आणि साखर उत्पादनात उत्तर प्रदेशपेक्षा आघाडीवर असल्याचे गाळपाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्ट्रिज लिमिटेडकडील (NFCSF) आकडेवारीनुसार, ३१ डिसेंबर २०२३ अखेर, महाराष्ट्रातील १९५ साखर कारखान्यांमध्ये हंगाम २०२३-२४ साठी गाळप सुरू आहे. आणि ४२६.८२ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. आतापर्यंत ३८.२० लाख टन साखर उत्पादित झाली आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशात १२० साखर कारखान्यांनी आतापर्यंत गाळप सुरू केले आहे. उत्तर प्रदेशात ३५९.०७ लाख टन ऊस गाळप करून ३४.६५ लाख टन साखर उत्पादित करण्यात आली आहे.
मात्र, साखर उताऱ्याचा विचार केला तर उत्तर प्रदेश महाराष्ट्रापेक्षा आघाडीवर आहे. महाराष्ट्राचा साखर उतारा ८.९५ टक्के आहे तर उत्तर प्रदेशात ९.६५ टक्के आहे. NFCSF कडील आकडेवारीनुसार, देशात ५११ साखर कारखान्यांमध्ये हंगाम २०२३-२४ साठी गाळप सुरू झाले आहे. आतापर्यंत १२२२.६४ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यापासून आतापर्यंत ११२.१० लाख टन साखर उत्पादित झाली आहे.