नवी दिल्ली : भारतात ऊस गळीत हंगाम गती घेऊ लागला आहे. मोठ्या राज्यांमध्ये साखर कारखान्यांनी गाळप सरू केला आहे. याबाबत नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड (NFCSF) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत, देशभरातील ३८१ साखर कारखान्यांमध्ये २०२४-२५ या हंगामासाठी गाळप सुरू आहे. एकूण ३३२.६८ लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्यापासून २७.९० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत ४३३ साखर कारखान्यांनी ५१२.१७ लाख टन उसाचे गाळप केले होते. त्यातून ४३.२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.
देशातील साखरेचा उतारा गेल्या हंगामातील जवळपास सारखाच आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत साखरेचा सरासरी उतारा ८.३९ टक्के आहे. मागील हंगामातील याच कालावधीत हा दर ८.४३ टक्के होता. राज्यनिहाय साखर उत्पादनाचा विचार करता, महाराष्ट्रातील कारखान्यांनी ६४.७९ लाख टन उसाचे गाळप करून ४.६० लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. उत्तर प्रदेशात ११८ साखर कारखान्यांनी १४८.२८ लाख टन उसाचे गाळप करून १२.९० लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. तिसरे सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या कर्नाटकमध्ये ७८.६५ लाख टन उसाचे गाळप करून साखरेचे उत्पादन ७ लाख टनांवर पोहोचले आहे. एनएफसीएसएफच्या म्हणण्यानुसार, या हंगामात साखरेचे उत्पादन २८० लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.