नवी दिल्ली : देशात ऊस गळीत हंगामाला वेग आला आहे. प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये बहुसंख्य कारखान्यांनी कामकाज सुरू केले आहे. याबाबत नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड (NFCSF) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १५ डिसेंबर २०२४ पर्यंत, देशभरातील ४७२ साखर कारखान्यांमध्ये २०२४-२५ हंगामासाठी गाळप सुरू आहे. एकूण ७१९.२४ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यापासून ६०.८५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
गेल्या हंगामात समान कालावधीत ५०१ साखर कारखान्यांनी ८५०.९२ लाख टन उसाचे गाळप केले होते. त्यातून ७४.२० लाख टन साखरेचे उत्पादन मिळाले होते. देशातील साखरेचा उतारा दर गेल्या हंगामाच्या तुलनेत कमी आहे. १५ डिसेंबरपर्यंत साखरेचा सरासरी उतारा ८.४६ टक्के आहे. मागील हंगामात याच कालावधीत साखर उतारा ८.७२ टक्के होता. राज्यनिहाय साखर उत्पादनात महाराष्ट्रातील १८३ कारखान्यांनी २०७.४१ लाख टन उसाचे गाळप केले असून, त्यापासून १६.८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
उत्तर प्रदेशात सर्व साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. एकूण १२० साखर कारखान्यांनी २५७.८७ लाख टन उसाचे गाळप केले असून, त्यापासून २२.९५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. तिसरे मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या कर्नाटकात मागील हंगामाच्या तुलनेत आणखी तीन साखर कारखाने सुरू झाले आहेत. सध्या ७६ साखर कारखाने सुरू आहेत. तर गत हंगामात याच काळात ७३ कारखाने सुरू होते. राज्यात १६२.६५ लाख टन उसाचे गाळप होऊन एकूण साखर उत्पादन १३.५० लाख टनांवर पोहोचले आहे. एनएफसीएसएफच्या मते, २०२४-२५ या हंगामासाठी साखरेचे उत्पादन २८० लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.