जी-20 प्रमुख कृषी संशोधकांची (एमएसीएस) दुसऱ्या दिवशी बैठक

वाराणसीमध्ये आज जी 20 बैठकीच्या दुसऱ्या दिवशी, प्रमुख कृषी संशोधकांची (एमएसीएस) बैठक झाली. यामध्‍ये डिजिटल कृषी आणि शाश्वत कृषी मूल्य साखळी आणि कृषी संशोधन तसेच विकासामध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारी यावर चर्चा झाली. या बैठकीत एमएसीएस कम्यूनवरही चर्चा झाली. कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे (डीएआरई) सचिव आणि आयसीएआरचे महासंचालक, डॉ. हिमांशू पाठक हे एमएसीएस अध्‍यक्षपदही भूषवित आहेत, यांनी या चर्चेचे नेतृत्व केले.

सकाळच्या सत्रात डिजिटल कृषी आणि शोधक्षमता यावर भर देण्‍यात आला. अन्नाचे नुकसान टाळणे आणि कचरा कमी करण्यासाठी डिजिटल तांत्रिक उपाय; कृषी तंत्रज्ञान स्टार्टअप परिसंस्था, बहुशाखीय कृषी विस्तार आणि सल्लागार सेवा (ईएएस): प्रयोगशाळांमध्‍ये होणारे कार्य प्रत्यक्ष जमिनीपर्यंत पोहोचावे आणि अल्पभूधारकांना आणि कुटुंबांची शेती सुधारण्यासाठी भागीदारी असावी. यावर चर्चा करण्यात आली. जी20- कृषी- संशोधन आणि विकासासाठी ‘ग्लोबल साउथ कोऑपरेशन’, सार्वजनिक वस्तूंसाठी सार्वजनिक-खाजगी कृषी- संशोधन आणि विकास : नवकल्पना निर्माण आणि गतिमान करण्याचा अनुभव, या विषयांवर सर्व प्रतिनिधींनी चर्चा केली.

त्याआधी आज, अन्‍न आणि कृषी संघटनांबरोबर (एफएओ) द्विपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. डॉ. पाठक यांनी कृषी विज्ञान केंद्रामार्फत (केव्‍हीके) शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणारी विस्तार सेवा हे सहकार्याचे अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र असेल यावर भर दिला. एफएओ प्रतिनिधींनीही विस्तार सेवेत सहकार्य करण्याविषयी उत्सुकता दाखवली. एफएओचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. इश्माहाने एलौफी आणि एफएओ चे वरिष्ठ कृषी अधिकारी डॉ. सेल्वाराजू रामसामी या बैठकीत सहभागी झाले होते. ते म्हणाले, बियाणे क्षेत्रातील भारताची ताकद आपण ओळखली आहे. याचा खूप मोठा उपयोग इतर देशांनाही होईल.

यानंतर संध्याकाळी सर्व प्रतिनिधींनी सारनाथ येथील पुरातत्व स्थळ आणि भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण संस्थेच्या संग्रहालयाला भेट दिली आणि ध्वनिप्रकाश कार्यक्रमाचा आनंद घेतला.

वाराणसी येथे “शाश्वत शेती आणि निरोगी लोक आणि पृथ्‍वी यासाठी अन्न व्यवस्था” या संकल्पनेवर प्रमुख कृषी शास्त्रज्ञांची तीन दिवसीय जी 20 बैठक सुरू आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री जनरल (डॉ.) व्ही के सिंग (निवृत्त) यांच्या हस्ते काल या बैठकीचे उद्घाटन करण्यात आले.

भरड धान्ये आणि इतर प्राचीन धान्य याविषयावर भारताच्या पुढाकारावर चर्चा करण्यासाठी एमएएचएआरआयएसएचआय (महर्षी) च्यावतीने एक सत्र आयोजित करण्यात आले होते. जी- 20 राष्ट्रांचे प्रतिनिधी, निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी महर्षी उपक्रमाला पाठिंबा दिला आणि सांगितले की, बाजरीसह इतर भरडधान्ये म्हणजे स्मार्ट पीके आहेत आणि ‘सुपर हेल्थ फूड’ असल्यामुळे, आंतरराष्ट्रीय संशोधन सहकार्य, या पिकांच्या त प्रचारासाठी आणि दत्तक घेण्यासाठी महत्त्वाचे आहे.

डॉ. हिमांशू पाठक आणि इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर अॅग्रीकल्चर, फूड अँड द एन्व्हायर्नमेंट (आयएनआरएई) (फ्रान्स) चे अध्‍यक्ष आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी फिलिप मौगुइन, यांनी भारत आणि फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय बैठकीत आपापल्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले.

दोन्ही देशांनी हवामान बदल, पीकांमधील वैविध्य, मृदा आणि जलसंधारण, नैसर्गिक शेती आणि जैवसंवर्धन पिकांच्या क्षेत्रात सहकार्यासाठी उत्सुकता व्यक्त केली.

काल संध्याकाळी प्रतिनिधींनी गंगा नदीच्या पर्यटनाबरोबरच गंगा आरतीचा अनुभव घेतला आणि त्यानंतर उत्‍साहवर्धक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता.

या तीन दिवसीय बैठकीमध्‍ये जी- 20 सदस्य देश, निमंत्रित अतिथी देश, आंतरराष्ट्रीय संस्था आणि भारताचे विशेष निमंत्रित असे सुमारे 80 परदेशी प्रतिनिधी सहभागी होत आहेत.

बैठकीच्या अखेरच्‍या दिवशी, 19 एप्रिल 2023 रोजी एमएसीएस कम्युनिकवर चर्चा करण्‍यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here