बिद्री साखर कारखान्याकडून वाढीव १०७ रुपयांचा दुसरा हप्ता अदा : कार्यकारी संचालक के. एस. चौगले

कोल्हापूर: येथील साखर कारखान्याने वाढीव ऊस दराचा १०७ रुपयांचा दुसरा हप्ता आज संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी दिली. गत हंगामात गळितास आलेल्या उसाला ३४०७ रुपये अंतिम ऊसदर देणार असल्याची घोषणा अध्यक्ष के. पी. पाटील व संचालक मंडळाने केली होती. याआधी कारखान्याने दोन टप्प्यात ३३०० रुपये उत्पादकांना दिले होते. कार्यकारी संचालक चौगले म्हणाले, गेल्या गळीत हंगामात कारखान्यात ९ लाख ५४ हजार ७७६ मे. टन उसाचे गाळप झाले असून, त्यापासून ११ लाख ९८ हजार ७०० क्विटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. सरासरी उतारा १२.५५ इतका मिळाला आहे. त्यानुसार प्रती टन ३२०० रुपयेप्रमाणे रक्कम रुपये ३०५ कोटी ५२ लाख याआधी आदा केले आहेत.

कारखान्याच्या निवडणुकीनंतर नूतन संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत अध्यक्ष के. पी. पाटील यांनी प्रती टन रुपये २०७ इतका वाढीव ऊसदर दोन हप्त्यात देण्याची घोषणा केली होती. पहिल्या हप्त्याची प्रती टन १०० रुपयेप्रमाणे होणारी रक्कम रुपये ९ कोटी ५२ लाख आदा केली आहे. कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उर्वरित १०७ रुपये दिवाळीला देण्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी जाहीर केले होते. त्यानुसार दुसऱ्या हप्त्याची रु. १०७ प्रमाणे होणारी रक्कम १० कोटी २१ लाख ऊस पुरवठादारांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. आजअखेर ३४०७ रुपये प्रमाणे होणारी २२५ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम संबंधितांना आदा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here