सबसिडीवरील भारत ब्रँड आटा आणि तांदूळाच्या किरकोळ विक्रीचा दुसरा टप्पा सुरू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंगळवारी NCCF, NAFED आणि केंद्रीय भंडार या एजन्सींच्या मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून भारत ब्रँड आटा आणि तांदूळाच्या किरकोळ विक्रीचा दुसरा टप्पा सुरू केला. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्हॅनला हिरवा झेंडा दाखवला.दुसऱ्या टप्प्यात ग्राहकांना 30 रुपये प्रति किलो एमआरपीवर भारत आटा आणि 34 रुपये प्रति किलो एमआरपी दराने तांदूळ उपलब्ध करून दिला जात आहे.

कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री जोशी म्हणाले की, ग्राहकांना अत्यावश्यक अन्नपदार्थ सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावेत, यासाठी सरकार हा उपक्रम राबवत आहे. भारत ब्रँड अंतर्गत तांदूळ, आटा आणि डाळ यासारख्या मूलभूत खाद्यपदार्थांच्या किरकोळ विक्रीद्वारे थेट हस्तक्षेपामुळे किमती स्थिर राखण्यात मदत झाली आहे, असेही ते म्हणाले.

दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात 3.69 LMT गहू आणि 2.91 LMT तांदूळ किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात, सुमारे 15.20 LMT आटा आणि 14.58 LMT तांदूळ उपलब्ध करून देण्यात आला होता.भारत ब्रँड आटा आणि भारत तांदूळ केंद्रीय भंडार, NAFED आणि NCCF आणि ई-कॉमर्स/बिग चेन किरकोळ विक्रेत्यांच्या स्टोअर आणि मोबाईल व्हॅनवर उपलब्ध असतील. ‘भारत’ ब्रँडचा आटा आणि तांदूळ 5 किलो आणि 10 किलोच्या बॅगमध्ये विकले जातील, असे सरकारने एका निवेदनात म्हटले आहे.

पंजाबमधील खरीप धानाच्या खरेदीबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्र्यांनी पंजाबमध्ये 184 लाख टन लक्ष्यित खरेदी अंदाज गाठण्यासाठी आणि शेतकऱ्यांनी मंडईत आणलेल्या प्रत्येक धान्याची खरेदी करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. 4 नोव्हेंबरपर्यंत, पंजाबच्या मंडईंमध्ये एकूण 104.63 LMT धानाची आवक झाली असून त्यापैकी 98.42 LMT ची खरेदी राज्य संस्था आणि FCI द्वारे करण्यात आली आहे. धानाची खरेदी 2320 रुपयांच्या एमएसपीवर केली जात आहे. चालू खरीप विपणन हंगाम 2024-25 मध्ये आतापर्यंत भारत सरकारने एकूण 20,557 कोटी रुपयांची खरेदी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here