पुणे : चीनी मंडी
शेतकरी उसाच्या पारंपरिक लागवडीला आता राम राम करणार आहेत. कारण, इतर पिकांप्रमाणे आता ऊस लागवडही बियांपासून होणार आहे. विशेष म्हणजे उसाच्या बियांचा शोध भारतातील शास्त्रज्ञांनी लावला आहे. त्यामुळे भारतीयांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट ठरली आहे. या उसाच्या बियांमुळे पिकाची रोग प्रतिकारक शक्ती वाढणार आहे. तसेच उत्पादनही तिप्पट होणार असून, कमी काळात उसाचे पिक घेणेही शक्य होणार आहे.
उत्तर प्रदेशात मेरठमधील सरदार वल्लभभाई पटेल कृषी आणि औद्योगिक विद्यापीठात उसाच्या बियांचे संशोधन झाले आहे. तेथील डॉ. मनोज शर्मा यांनी संशोधन करून उसाचे बियाणे तयार करण्यात यश मिळविले आहे. या बियाणांची तीनवेळा फिल्ड ट्रायल घेण्यात आली असून, त्यातून ऊस शेतीमध्ये क्रांतीकारी बदल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उसाच्या बियांना गोळी स्वरूपात तयार करण्यात आले आहे. यापद्धतीने रोगमुक्त ऊस लागवड होईल, असा दावा डॉ. शर्मा यांनी केला आहे. या संशोधनाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. गया प्रसाद यांनी शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे.
मुळात उसाची लागवड कांडी, रोपलावण किंवा एक डोळा पद्धतीने होते. उसाच्या बियाही मिळतील, हे थोडे स्वप्नवत वाटत होते. पण, डॉ. शर्मा यांच्या संशोधनाने हे स्वप्न पूर्ण झाले आहे. या संशोधनाविषयी बोलताना डॉ. शर्मा म्हणाले, ‘बियांपासून अगोदर नर्सरीत रोपे तयार होतात. दीड ते दोन महिन्यांत ही रोपे लावणीला योग्य होतात. त्यामुळे पिकांचा कालावधी थेट दोन महिन्यांनी कमी होतो. पारंपरिक पद्धतीने लागवड करताना एका एकरासाठी किमान अर्धा टन ऊस लागतो. या पद्धतीत बियांपासून तयार केलेली केवळ सह हजार रोपो पुरेशी होतात. त्यामुळे खर्चातही बचत होते.’