कोल्हापूर : कर्नाटक सरकारने साखर आणि इथेनॉलबाबत नवे धोरण ठरवण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. कर्नाटकचे वाणिज्य व उद्योग सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीवर महाराष्ट्राचे निवृत्त साखर संचालक शेखर गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दहा सदस्यीय समितीत महाराष्ट्रातून गायकवाड यांच्याबरोबरच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे डॉ. संजय पाटील यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. निजलिंगाप्पा शुगर इन्स्टिट्यूट येथे नुकतीच समितीची पहिली बैठक पार पडली. कर्नाटक सरकारच्यावतीने जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार नवीन साखर कारखाने आणि इथेनॉल उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी उसाची, तसेच पाण्याची उपलब्धता तपासणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार दोन कारखान्यांमधील अंतराची अट आदींसह विविध मुद्यांवर तज्ज्ञांकडून शास्त्रीय, तंत्रशुद्ध अहवाल सादर होणे आवश्यक आहे, त्यासाठी ही समिती स्थापन करण्यात येत आहे.