‘मारुती महाराज’ च्या चेअरमन, व्हाईस चेअरमनपदासाठी आज निवड

लातूर : औसा तालुक्यातील बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक अवघ्या दोन जागांचा अपवाद वगळता अन्य संचालकांच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. चेअरमन व व्हाईस चेअरमनच्या निवडी आज (दि.२३) होणार आहे. चेअरमन व व्हाईस चेअरमन पदी कोणाची लॉटरी लागणार, याकडे लक्ष्य लागले आहे.

बेलकुंडचा बंद अवस्थेतील मारुती महाराज साखर कारखाना आता मजबूत झाला आहे. पुढील २५ वर्षे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचा प्रश्न यामुळे मिटला आहे. अवघ्या तीन वर्षांतच या भागात ऊस लागवड वाढली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिकक्रांती आली आहे. शेतकऱ्यांच्या मालकीचा हा कारखाना पुन्हा जोमाने उभा करण्याची किमया राज्यात पहिल्यांदाच माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी करून दाखविली. सहकारी साखर कारखाना कसा चालवावा, याचे उत्तम उदाहरण देशमुख यांनी राज्याला दाखवून दिले. सलग दहा वर्षे बंद असलेला हा कारखाना दुप्पट क्षमतेने सलग तीन वर्षांपासून जोमाने सुरू आहे.

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात आमदार अभिमन्यू पवार व माजी आमदार दिनकर माने यांनी एकत्र येऊन ही निवडणूक बिनविरोध केली. आता याच कारखाना चेअरमन व व्हाईस चेअरमनची निवड महत्वाची मानली जात आहे. निवड कोणाची करायची, हे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख ठरविणार आहेत. निवडीचे बंद पॉकेट कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करेल, हे मंगळवारी (दि.२३) होणाऱ्या निवडीनंतर समजणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here