अहिल्यानगर : जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे कोट्यवधी रुपये देणे थकविले आहे. ऊस गाळपानंतर चौदा दिवसांत उसाचे पैसे संबंधित शेतकऱ्यांना अदा करणे आवश्यक असले, तरी काही साखर कारखान्यानी डिसेंबरपासून तर काही कारखान्यांनी जानेवारीपासून उसाचे पैसे अद्याप दिलेले नाहीत. हे थकीत बिले व्याजासह मिळावीत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी केली आहे. सातारा जिल्ह्यात साखर कारखान्यांकडे सुमारे साडेचारशे कोटी रुपये थकीत आहेत.
‘स्वाभिमानी’चे जिल्हा उपाध्यक्ष फुंदे यांनी साखर कारखान्यांनी थकीत ऊस बिले व त्यावर साडेतीन चार महिन्यांच्या १५ टक्के व्याजासह होणारी रक्कम त्वरित द्या, अन्यथा संबंधित साखर कारखान्यांवर व साखर आयुक्त कार्यालयासमोर बोंबाबोंब मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनातून दिले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांपैकी १६ कारखान्यांकडे एफआरपी थकीत आहे. १८ कारखान्यांचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे. बहुतेक कारखान्यांनी डिसेबर, तर काहींनी जानेवारीपर्यंत उसाची बिले दिली आहेत. आता कारखान्यांनी उर्वरीत पैसे लवकर द्यावेत, अशी मागणी फुंदे यांनी केली आहे.