हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
पुणे : चीनी मंडी
देशभरात मार्च महिन्यातील साखरेची विक्री ठप्प झाली आहे. व्यापारी आणि साखर उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात साखरेच्या किमान विक्री किमतीत वाढ होण्याच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांनी अतिरिक्त साखर विकली आहे. त्यामुळे साखरेची मागणीच कमी आली असून, बाजारपेठ ठप्प झाली आहे.
साखरेच्या किमान विक्री दरात वाढ होण्याची शक्यता असल्याने गेल्या महिन्यात २९ रुपयांना मोठ्या प्रमाणावर साखर विक्री करण्यात आली. आता हीच साखर अजूनही बाजारपेठेत आहे. त्याला उठाव नाही. त्यामुळे मार्चमधील साखर विक्री वर परिणाम झाल्याची माहिती महाराष्ट्रातील एका साखर व्यापाऱ्याने दिली. उन्हाळ्यात साखरेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते, हे गृहित धरून सरकारने मार्च महिन्याच्या साखर विक्री कोट्यात मोठी वाढ केली. मार्चसाठी सरकारने २४.५० लाख टन विक्री कोटा जाहीर केला. जून २०१८पासून जाहीर करण्यात येत असलेल्या मासिक विक्री कोट्यात आजवरचा हा सर्वाधिक विक्री कोटा आहे.
साखर उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साखर कारखान्यांना गेल्या दहा महिन्यांत देण्यात आलेल्या विक्री कोट्याच्या केवळ ८५ टक्के साखरच कारखान्यांना विकता आली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत ३१ रुपये किलो या किमान विक्री किमतीच्याही खाली साखरेची विक्री केल्याचा आरोप कारखान्यांवर होऊ लागला आहे.
भारताच्या बाजारपेठेत नक्कीच साखर अधिक आहे. पण, येत्या १५ मार्चनंतर उन्हाळ्यात असणारी साखरेची मागणी वाढू लागेल, अशी साखर कारखान्यांना अपेक्षा आहे, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, काही कारखाने दिलेल्या कोट्यापेक्षा जास्त साखर विक्री करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. केंद्र सरकारने कारखान्यांकडून साखर एकत्र उचलावी आणि ती सार्वजनिक वापरासाठी खुली करावी, असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे संजय खटाळ यांनी केली आहे. साखरेच्या विक्री बाबत वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळे आकडे पहायला मिळतात. सरकारने ते एकत्र करून जनतेसाठी जाहीर करावेत, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp