नवी दिल्ली : सोमवारी सादर झालेल्या अर्थसंकल्प २०२१ नंतर सलग दुसऱ्या दिवशीही भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा जबरदस्त उत्साह पहायला मिळाला. बँकिंग, फायनान्स, आयटी, ऑटोसह बहूतांश सेक्टर्समध्ये कंपन्यांच्या जबरदस्त शेअर खरेदीमुळे सेन्सेक्स मंगळवारी ११९७.११ अंक म्हणजेच २.४६ टक्क्यांनी वाढून ४९७९७.११ अंकांवर थांबला. तर एनएसईचा ५० शेअर्सवर आधारित निफ्टी निर्देशांक ३६६.६५ अंक म्हणजेच २.५७ टक्क्यांनी उसळून १४६४७ वर क्लोज झाला. निफ्टीवर टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक १६.९३ टक्क्यांची वाढ पहायला मिळाली.
बीएसई सेन्सेक्समध्ये एसबीआयच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ७.१० टक्क्यांची उसळी पहायला मिळाली. अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स ६.७० टक्के, एचडीएफसी बँकेचे शेअर्स ५.६३ टक्के, लार्सन अँड टूब्रोचे शेअर्समध्ये ४.८२ टक्के, भारती एअरटेलचे शेअर ३.५४ टक्के आणि मारुतीच्या शेअर्समध्ये ३.४५ टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. कोटक महिंद्रा बँक, सन फार्मा, पॉवरग्रीड, एचडीएफसी, एचसीएल टेक, महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी, बजाज ऑटो, ओएनजीसी, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रिज डॉ. रेड्डीज, आयटीसी, इन्फोसीस, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया, अॅक्सिस बँक आणि इंडसइंड बँकेचे शेअर्स प्लसमध्ये क्लोज झाले.
दुसरीकडे बजाज फिनसर्व्हच्या शेअर्समध्ये सर्वाधिक २.३४ टक्क्यांची घसरण पहायला मिळाली. टायटनचे शेअर १.०८ टक्के आणि हिंदूस्थान युनीलिव्हरचे शेअर्स ०.७७ टक्क्यांनी घसरले.
रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडच्या रिसर्च विभागाचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले की, शेअर बाजार सलग दुसऱ्या सत्रात उसळला आहे. गुंतवणूकदारांनी केंद्रीय अर्थसंकल्पात अधिक इच्छा दर्शवली आहे. अर्थसंकल्पात विकासाला गती देण्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. सकारात्मक जागतिक स्थितीमुळे शेअर बाजारात तेजी पहायला मिळत आहे. सोबतच ऑटोमोबाइल कंपन्यांकडून विक्रीची आकडेवारी सकारात्मक असल्यानेही शेअर बाजारात तेजी दिसत आहे.