अयोध्या : जिल्ह्यात नव्या गळीत हंगामाची पूर्वतयारी म्हणून करण्यात आलेल्या ऊस सर्वेक्षणात यंदा लागवड क्षेत्रात सात टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या सर्व्हेची माहिती २० जुलैपासून प्रदर्शित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १२९९ गावांमध्ये एकूण एक लाखाहून अधिक शेतकरी ऊस शेती करतात. गेल्यावर्षी या शेतकऱ्यांनी ४५,५०८ हेक्टरमध्ये ऊस पिकाची लागवड केली होती. येथील उसाचा पुरवठा केएम शुगर मिल्स लिमिटेड मोतीनगर आणि रौजागाव साखर कारखान्याला केला जातो.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून सुरुवातीला ऊस बिले देण्यास गती आली होती. नंतर मात्र, ही प्रक्रिया अतिशय संथ झाली. अद्यापही मसौधा साखर कारखान्याने शंभर टक्के ऊस बिले दिलेली नाहीत. मात्र, नकदी पिकांचा इतर ठोस पर्याय नसल्याने ऊस शेतीबाबत शेतकऱ्यांची रुची वाढत आहे. सर्वेक्षण अहवालानुसार, १२९९ गावांतील १,३१, ४२० शेतकऱ्यांनी ४८,६९४ हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड केली आहे. यामध्ये २५,९३२ हेक्टरमध्ये लागण तर २५,८६१ हेक्टर क्षेत्रात खोडवा ऊस आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सात टक्क्यांनी ऊसाच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ दिसून आली आहे. २० जुलैपासून सर्व्हेची माहिती सार्वजनिक केली जाणार आहे. जिल्हा ऊस अधिकारी हुदा सिद्दीकी यांनी सांगितले की, सर्व्हेतील माहितीमध्ये जर काही त्रुटी असतील तर शेतकऱ्यांनी त्याची दुरुस्ती करून घ्यावी. ही प्रक्रिया आता सुरू केली जाईल.