जळगाव : यंदा खानदेशात सात साखर कारखाने सुरू आहेत. त्यामुळे गाळपासंबंधी अडचणी कमी झाल्या आहेत. ऊस लागवडही स्थिर आहे. मागील तीन वर्षांत लागवड क्षेत्रात वाढ झाली. जळगाव जिल्ह्यात गेल्यावर्षी १२ हजार हेक्टरवर ऊस पीक होते. यंदाही ते याच आकडेवारीवर स्थिर आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात १३ हजार हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. काही भागात ऊस लागवड कमी झाली आहे. परंतु काही भागात त्यात वाढ दिसून येते. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, भडगाव आदी भागात ऊस लागवड थोडी वाढली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात तीन साखर कारखाने गाळप करीत आहेत. यापैकी समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील कारखान्याने खानदेशात सर्वाधिक गाळप केले आहे. पाच लाख टनांवर ऊस गाळप झाल्याचे सांगण्यात आले. जळगाव जिल्ह्यात चार साखर कारखाने सुरू आहेत. धुळे जिल्ह्यात चार हजार हेक्टरवर ऊस आहे. नंदुरबारमध्ये १३ हजार हेक्टरवर ऊस असून, शहादा, तळोदा व नवापूर तालुक्यात ऊस पीक अधिक आहे. यंदा मार्चअखेर खानदेशात १०० टक्के उसाचे गाळप होईल, असे चित्र आहे.