कोल्हापूर:देशाच्या साखर उद्योगात आपली वेगळी ओळख निर्माण केलेला शाहू साखर कारखाना विविध उपपदार्थ निर्मितीवर भर देणार आहे. त्यासाठी पुढील दहा वर्षांचे नियोजन तयार आहे, असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर झाली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे होत्या. घाटगे म्हणाले, शाहू कारखान्याने गेल्या हंगामात चार प्रकल्पांची उभारणी केली. भविष्यात बायो सीएनजी, कार्बन-डाय ऑक्साईड व सौरऊर्जा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्याचे नियोजन आहे. ते म्हणाले, कारखान्याने सोळा वर्षांपूर्वी सहवीज निर्मिती प्रकल्प सुरू केला. या कालावधीत कारखान्याने आजपर्यंत शंभर कोटी युनिटस् वीजनिर्मितीचा टप्पा ओलांडला आहे.
अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे म्हणाल्या कि, विक्रमसिंह घाटगे यांच्या पश्चात कारखान्याचा नावलौकिक व यशाचा आलेख सातत्याने चढता राहिलेला आहे. कारखाना पर्यायाने सभासद, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी समरजितसिंहना साथ द्यावी. यावेळी नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज (नवी दिल्ली) यांच्याकडून देशातील अतिउत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (पुणे) यांचा सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार, को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचा सर्वोत्कृष्ट को जनरेशन पॉवर प्लांट पुरस्कार मिळाल्याबद्दल सुहासिनीदेवी घाटगे व समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार सभासद व शेतकऱ्यांनी केला. उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी स्वागत केले. विषयपत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केले. विषय पत्रिकेतील विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. संचालक युवराज पाटील यांनी आभार मानले. सभेस ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील, संचालक उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.