कागल : कोरोना आणि त्याचबरोबर संपूर्ण देशभरात झालेल्या लॉक डाउन चा मोठा फटका साखर उद्योगालाही बसला आहे. यामुळे अर्थिक मंदी सह असंख्य अडचणी साखर उद्योगासमोर उभ्या आहेत. या पार्श्वभुमीवर कारखाना व्यवस्थापन व सभासद शेतकऱ्यांनी एकत्रितपणे या संकटावर मात करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी आता सेंद्रीय ऊस शेती करावी. शाहू साखर कारखान्यामार्फत सेंद्रिय ऊस शेतीला प्रोत्साहन देणार असल्याचे शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.
शाहू साखर कारखान्याच्या वतीने ऑनलाइन ऊस पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे बोलत होते. या परिसंवादाला शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका सुहासिनीदेवी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना सुहासिनी देवी घाटगे म्हणाल्या, शाहू कारखान्याने नव्या तंत्राचा अवलंब करण्याबाबत कायमच सकारात्मकता दर्शवली आहे. या तंत्राचा वापर शेतीमध्ये करुन एक नवा पायंडा ही शाहू ने घालून दिला आहे. सध्याच्या मंदीच्या पार्शवभूमीवर नवे तंत्रज्ञान स्विकारुन ते आत्मसात करणे आवश्यक आहे. कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांनी देखील अनेक नव्या वाटा चोखाळून त्या यशस्वीपणे राबवल्या आहेत.
ऊस शेतकऱ्यांशी असा मार्गदर्शक आणि आपुलकीचा संवाद साधणारा शाहू हा पहिलाच कारखाना असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. एकहजारहून अधिक सभासदांनी घरबसल्या या परिसंवादाचा लाभ घेतला. कारखान्याच्या नऊ केंद्रातील शंभरपेक्षा अधिक ठिकाणांहून शेतकरी सहभागी झाले.
या परिसंवादावेळी कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयाचे शास्त्रज्ञ डॉ.अशोक पिसाळ यांनी ऊस पिकातील हुमणीचे नियंत्रण व सेंद्रिय शेतीबाबत योग्य आणि सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ऊस लागवड, किटकनाशक फवारणी याबाबतही माहिती दिली.
स्वागत व प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील यांनी केले. उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी आभार मानले. कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. परिसंंवादाचे संयोजन शेती अधिकारी रमेश गंगाई व सीडीओ के. बी. पाटील यांनी केले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.