कागलच्या शाहू साखर कारखान्यास भारतातील “सर्वोत्कृष्ट साखर कारखाना” पुरस्कार प्रदान; दिल्ली येथे शानदार वितरण समारंभ 

कागल : श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी नवी दिल्ली या साखर कारखान्यांच्या  संस्थेकडून सन २०१८-१९ या हंगामासाठी भारतातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून जाहीर झालेला कै वसंतदादा पाटील विशेष पुरस्कार केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे  चेअरमन विजयपॉल शर्मा यांच्या शुभहस्ते व नॅशनल फेडरेशनचे चेअरमन दिलीप सिंह वळसे-पाटील व्हाईस चेअरमन केतनभाई पटेल माजी चेअरमन कल्लाप्पाणा आवाडे, हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली येथे दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे, व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील, संचालक यशवंत उर्फ बॉबी माने, युवराज पाटील, डॉ डी एस पाटील, डॉ टी ए कांबळे, भुपाल पाटील, मारुती निगवे, बाबुराव पाटील, पी डी चौगले, सचिन मगदूम, संचालिका रूक्मीणी पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण व निवडक कर्मचाऱ्यांनी स्वीकारला. या पुरस्कारांसह कारखान्यास आजपर्यंत राष्ट्रीय व राज्य पातळीवरील मिळालेल्या पुरस्कारांची संख्या 61 वर पोहचली आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले,राष्ट्रीय पातळीचा ‘सर्वोत्कृष्ट साखर कारखाना’ पुरस्कार शाहू साखर कारखान्यातर्फे स्वीकारत असताना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शाहू कारखान्याशी जोडले गेलेल्या प्रत्येकाच्या अथक मेहनतीचे सार्थक झाल्याची भावना मनात येत आहे. संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे स्वप्नातून उभी राहिलेली ही संस्था आज योग्य मार्गाने प्रगती करते आहे हे या पुरस्कारामुळे दिसून येत आहे. कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी, संपूर्ण कर्मचारी वर्ग आणि सभासद या सर्वांनी दाखवलेला विश्वास, शाहू कारखाना हे आपले कुटुंब मानून केलेले काम याचे हे फळ आहे. यापुढे देखील शाहू कारखान्याची यशस्वी वाटचाल आपणा सर्वांच्या साथीने आणि शुभेच्छांसह अशीच अविरत सुरू राहो. आपणा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि हा पुरस्कार संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे स्मृतीला आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाला अर्पण. कारखाना चालवित असताना सभासद, संचालक मंडळ,अधिकारी,कर्मचारी ऊस पुरवठादार यांचेसह सर्वच घटकांची साथ नेहमीच उत्तम मिळाली आहे. त्याचे हे फलित आहे. कारखान्याच्या एकूणच कामकाजाचे सखोल व गुणात्मक परीक्षण करूनच या पुरस्कारासाठी शाहू कारखान्याची निवड केली आहे. हा शाहू ग्रुप परिवाराचा सन्मान आहे. या परिवारास हा पुरस्कार मी समर्पित करतो.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here