बेळगाव : नवी दिल्लीतील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे २०२२-२३ या गळीत हंगामासाठी कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला ‘सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना’ हा देशपातळीवरील पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराने शाहू कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, असे मत शाहू कारखान्याचे जेष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी केले. बेळगाव जिल्ह्यातील कोगनोळी येथे सभासद आणि शेतकऱ्यांनी कारखान्याला पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला. यावेळी ते बोलत होते.
वीरकुमार पाटील म्हणाले की, कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांचे मार्गदर्शन, संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या वाटचालीने हा पुरस्कार मिळाला आहे. त्याला सभासद, शेतकऱ्यांनी विश्वासाने दिलेली साथ, व्यवस्थापनाचे नियोजन मोलाचे ठरले आहे. यावेळी माजी जि. पं. उपाध्यक्ष पंकज पाटील, ग्रा. पं. सदस्य दिलीप पाटील, तात्यासाहेब कागले, युवराज कोळी, बाळासाहेब कागले, अनिल चौगुले, बाळासाहेब पाटील, के. डी. पाटील, धनंजय पाटील, आप्पासाहेब खोत, संजय पाटील, संजय डूम, संजय खोत, बाळासाहेब कोळेकर आदी उपस्थित होते.