नवी दिल्ली : चीनी मंडी
तमीळनाडूतील कोईम्बतूर येथील शक्ती शुगर्स या कंपनीने पुढील वर्षीपासून इथेनॉल उत्पादन सुरू करणार असल्याचे जाहीर केले. शक्ती शुगर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष एम. मणिकम यांनी ही घोषणा केली.
इथेनॉल उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी किंवा नव्याने सुरू करण्यासाठी सरकारने कारखान्यांना एक विशेष पॅकेज जाहीर केले आहे. त्या अंतर्गत कारखान्यांना अल्प मुदतीचे कर्ज देण्यात येत असून, त्याच्या व्याजाची जबाबदारीही सरकार उचलणार आहे. या योजनेअंतर्गतच आणखी ७ हजार ४०० कोटी रुपयांचे पॅकेज सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
या संदर्भात बोलताना यापूर्वी आम्ही इथेनॉल क्षमता वाढीचा विचार केला नसल्याची माहिती देत एम. मणिकम म्हणाले, ‘आम्ही आताच दुष्काळी स्थितीतून बाहेर पडलो आहोत. त्यामुळे आमच्याकडे जास्त ऊस नाही. तेव्हा सध्याच्या घडीला आमच्याकडे जी क्षमता आहे ती पुरेशी आहे.’
सध्या शक्ती शुगर्स इथेनॉल निर्मिती करत नाही. आमच्याकडे अल्कोहोल निर्मितीवर जास्त भर दिला जातो. पण, पुढील वर्षापासून आम्ही इथेनॉल निर्मिती करायला सुरुवात करू, असे मणिकम यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच दर अतिशय कमी असल्याचे सांगून मणिक म्हणाले, ‘भारतातील साखरेचा उत्पादन खर्च साधरण ३५ रुपयांपर्यंत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या साखरेला १९ रुपये प्रति किलो, असा दर मिळत आहे. या स्थिती निर्यात करणे शहाणपणाचे नाही. देशांतर्गत बाजारात साखर ३० रुपये किलो आहे. तरी साखर कारखाने नुकसानीतच आहेत. कारण यातून थकबाकी आणि कर्जांचे हप्ते निघतात, असे वाटत नाही.’
देशातील २०१९च्या साखर उद्योगातील संभाव्य स्थिती बाबत मणिकम म्हणाले, ‘सुरुवातीला देशात आणखी चांगले उत्पादन होईल, अशी शक्यता व्यक्त होत होती. आता साखर उत्पादन ३०० लाख टन किंवा त्या खाली येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याचे एक स्पष्ट चित्र दिसायला मार्च महिना उजाडावा लागेल. आपल्या देशाची गरज २६० लाख टन आहे आणि जर, उत्पादन ३०० लाख टनाच्या खाली राहिले, तर ती साखर उद्योगासाठी चांगली गोष्ट ठरणार आहे.’
निर्यातीसाठी ५० लाख टनाचे टार्गेट देण्यात आले असले तरी, ३० ते ४० लाख टन निर्यात होईल, अशी अपेक्षा असल्याचे मणिकम यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘सरकारने काही देशांशी थेट चर्चा सुरू केली आहे. यात चीन, इराण यांसारख्या देशांचा समावेश आहे. यातून काही चांगली चर्चा पुढे सरकल्यास साखर उद्योगाला याचा फायदा होईल.’
कारखान्यातील मळीचा विचार केला तर, राज्यानुसार त्याची किंमत बदलत असल्याचे मणिकम यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात अतिरिक्त मळी असल्याने त्यांना ती निकालात काढायची असते. त्यामुळे दर २०० ते ३०० रुपये असतो. तर तमीळनाडूमध्ये हाच दर ४ ते ५ हजार असतो, अशी माहिती मणिकम यांनी दिली.