शामली : तांत्रिक बिघाडामुळे अप्पर दोआब साखर कारखाना वारंवार बंद पडत असून नियमितपणे गाळप सुरू नसल्याचे दिसून येत आहे. शु्क्रवारी रात्री फक्त सात तास सुरू राहिलेला कारखाना बॉयलरमधील बिघाडामुळे शनिवारी सकाळी पुन्हा बंद पडला. पूर्ण दिवसभर कारखाना सुरू होऊ शकला नाही. साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना मोबाईलवर एसएमएस पाठवून तसेच कार्यक्षेत्रातील गावागावांत घोषणा करून कारखाना बंद झाल्याचे कळविण्यात आले आहे.
अमर उजालामधील वृत्तानुसार, यंदा शामली साखर कारखाना गळीत हंगाम प्रारंभानंतर सातत्याने बंद पडत आहे. तांत्रिक बिघाडाचे प्रमाण अधिक आहे. गेल्या तीन दिवसांपासून कारखाना योग्यरित्या सुरू नाही. कारखान्यातील रोलर, मोटरमध्ये बिघाड झाला आहे. रोलर, मोटर बिघाडानंतर शुक्रवारी रात्री ११ वाजता कारखाना सुरू झाला. मात्र, शनिवारी पहाटे पाच वाजता बॉयलरमध्ये दोष निर्माण झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना मेसेज पाठवून याची माहिती देण्यात आली. शामली कारखान्याचे ऊस विभागाचे सहाय्यक सरव्यवस्थापक दीपक राणा यांनी सांगितले की, पहाटे पाच वाजता शेतकऱ्यांना मेसेज पाठवून कारखाना बंद पडल्याची माहिती देण्यात आली आहे. उशीरापर्यंत कारखाना सुरू होऊ शकलेला नाही.