पुणे : चीनी मंडी
ऊस आणि उसाला लागणारं पाणी हा विषय कायम चर्चेत असतो. यावरून ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांवर टीकाही होत असते. पण, गेल्या काही वर्षांतील लहरी हवामान आणि दुष्काळी परिस्थिती पाहता आता हा विषय अधिक गांभीर्यानं हताळला पाहिजे. युरोपमध्ये बीटापासून साखर तयार केली जाते. आपण आता बिटाचे अर्थशास्त्र समजून घेतले पाहिजे, असा मोलाचा सल्ला माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. पुण्यात झालेल्या “साखर परिषद 20-20″च्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते.
काही दिवसांपूर्वी युरोप दौऱ्यावर गेल्याचा संदर्भ देत पवार म्हणाले, ‘युरोपमध्ये बिटापासून साखर तयार केली जाते. त्याचा आता आपण विचार कऱण्याची वेळ आली आहे. उसाच्या तुलनेत बिटाला ४५ टक्के पाणी कमी लागतं म्हणजे, ऊस पट्ट्यात थेट ५५ टक्के पाण्याची बचत होणार आहे. आपण युरोपसारखे १२ महिने बिटाचे पीक घेऊ शकत नाही. आपल्याकडे ऊस १२ ते १४ महिन्यांत घेतला जातो. बीट पाच ते सहा महिन्यांचे पीक आहे. बिटाला पाणी कमी लागतं त्याचबरोबर जमिनीची पत कायम राहते. बिटाचा चोथा जनावरांना चारा म्हणून वापरता येतो. युरोपमध्ये यातून दूध उत्पन्न वाढवण्याचा प्रयोगही झाला आहे. बिटाला १३ टक्के रिकव्हरी येते.’ त्यामुळे बिटाचे अर्थशास्त्र दुर्लक्षित करता येणार नाही, असे मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
पवार म्हणाले, ‘आपल्याला १०० टक्के बिटाची शेती करता येणार नाही. ऊस आणि बीट असा प्रयोग केला तर, आपल्याकडील साखर कारखान्यांचा हंगाम सात महिन्यांवर जाईल. त्यानंतरच कारखाने चालवणे परवडेल. त्यामुळे याचा निश्चित विचार केला पाहिजे. एका खासगी कारखान्याने ५०० एकरांत बीट लावले आहे. तो प्रयोग बघून आलो आहे. त्यातून काय रिझर्ल्ट येतो हे पाहूया. सध्या पेरणीचे आकडे पाहिले तर, पुढच्या हंगामात ४० ते ४५ टक्के उसाचं उत्पादन घटण्याचा धोका आहे पाण्याचं दुर्भिक्ष आहे. या आव्हानला सामोरं जायचं असेल तर, ऊस-बीट कॉम्बिनेशनचा विचार करायला हवा.’
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.