कोल्हापूर : प्रतिनिधी
साखरेची विक्री होत नसल्याने कारखाने अडचणीत आहेत. त्यांना ऊस उत्पादकांची एक रकमी एफआरपी देणे अशक्य आहे. यातून मार्ग काढण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे काही पर्याय असेल तर, त्यांना सहकार्य करू, असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक रकमी ऊस दरासाठी आंदोलन तीव्र केले आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
साखर कारखाने हे शेतकऱ्यांचेच असून, ते टिकावेत, अशी भूमिका घेणे गरजेचे असल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, ‘साखर उद्योगात परिस्थिती वेगळी आहे. देशातील कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साखर शिल्लक आहे. साखरेला उठाव नसल्याने कारखान्यांकडे कॅश फ्लो कमी झाला आहे. त्यामळे सध्या ऊस उत्पादकांना एक रकमी १०० टक्के ऊस दर देणे अशक्य आहे. द्यायचे झाल्यास कारखान्यांना कर्जे काढावी लागणार आहेत. त्याचा बोजा पुन्हा शेतकऱ्यांवरच पडेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करू. त्यांच्याकडे यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग असले, तर त्यांना माझे सहकार्य राहील.’ ते म्हणाले, ‘साखर नियंत्रण कायद्यानुसार कारखान्याला ऊस दिल्यानंतर १४ दिवसांत एफआरपीची रक्काम दिली पाहिजे हा नियम आहे. परंतु, साखर तयार होते, तशी गोदामांमध्ये साठवली जाते. त्यानंतर ती मागणीप्रमाणे विकली जाते.’ साखरेचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत आग्रही असतो. म्हणूनच या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे हा प्रश्न मांडल्याचे पवार यांनी सांगितले.
डाउनलोड करा चिनीमण्डी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp