सातारा : चालू गळीत हंगामामध्ये शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज साखर कारखाना गाळपासाठी येणाऱ्या उसाला प्रती टन ३,१५१ रुपये दर देणार आहे. हा दर एकरकमी व विनाकपात असल्याची माहिती कार्यकारी संचालक युगेंद्र पवार यांनी दिली. पहिल्या पंधरा दिवसांतील ऊस बिले लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. विविध तालुक्यांतील सर्व शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेत गाळप होईल असे त्यांनी सांगितले.
कार्यकारी संचालक युगेंद्र पवार म्हणाले की, फलटण, वाई, खंडाळा, भोर-वेल्हा, पुरंदर, जावळी, सातारा, कोरेगाव, माण, खटाव, माळशिरस, इंदापूर, बारामती आदी भागांतील कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणीसाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. वाढीव तोडणी यंत्रणा व हार्वेस्टर मशिनच्या माध्यमातून तोडणी यंत्रणा कार्यरत होणार आहे. शेतकऱ्यांनी जादा दर देण्याची केलेली मागणी लक्षात घेऊन शरयू कारखान्याच्या प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली. यापुढेही सर्वाधिक दर देऊन बिले वेळेवर अदा केली जातील.