कोल्हापूर : माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ऊस दराच्या प्रश्नाआड आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आंदोलन सुरू केले आहे. जवाहर, शरद, श्री दत्त, गुरुदत्त आणि पंचगंगा या पाच कारखान्यांना टार्गेट करून आंदोलन करीत आहेत, अशी टीका आमदार प्रकाश आवाडे यांनी केली. ऊस दरप्रश्नी शेट्टी यांनी एकाच व्यासपीठावर यावे, असे आव्हान त्यांनी दिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शुक्रवारी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांना त्यांच्या निवासस्थानी खर्डा भाकरी देण्यात आली.
दरम्यान, ऊस दराबाबत लवकर निर्णय न घेतल्यास लक्ष्मीपूजन, दीपावली पाडवा व भाऊबीज या दिवशीही कारखान्यावर येऊन खर्डा -भाकरी देऊन आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर शंभूशेटे यांनी दिला. रेणुका शुगर्सच्या अधिकाऱ्यांना खर्डा – भाकरी देवून आंदोलन करण्यात आले. रेणुका शुगर्सचे जनरल मॅनेजर प्रकाश सावंत व केन मॅनेजर सी. एस. पाटील यांना खर्डा – भाकरी, मिठाई देण्यात आली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दर आंदोलनाचा भाग म्हणून साखर कारखान्यांच्या चेअरमनना पाच दिवस खर्डा-भाकरी, मिठाई देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सागर शंभूशेटे, पुरंदर पाटील यांनी आमदार आवाडे यांची भेट घेतली. आमदार आवाडे म्हणाले की, जवाहर कारखान्याने सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे; परंतु सद्यस्थिती पाहता तुमची मागणी मान्य करणे अशक्यप्राय आहे. तरीही काही तरी तोडगा काढू. जयसिंगपुरातील विक्रमसिंह क्रीडांगणावरच सभा घेऊ आणि जाहीरपणे भूमिका मांडू असे सांगितले. कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासो चौगुले, केन कमिटी चेअरमन डॉ. राहुल आवाडे, संचालक आण्णासो गोटखिंडे, जिनगोंडा पाटील, आदगोंडा पाटील, शीतल अमण्णावर, संजय कोथळी, सुमेरू पाटील, अभय काश्मिरे आदी उपस्थित होते.