कोल्हापूर : ‘आंदोलन अंकुश’ संघटनेच्या पुढाकाराने शिरोळ- नृसिंहवाडी रोडवर शेतकरी वजन काटा उभारण्यात आला होता. शेतकऱ्यांनी आपल्या उसाचे वजन या काट्यावर करून मगच तो साखर कारखान्याला पाठवला. त्यामुळे या कारखान्यांना आपले वजन काटे दुरुस्ती करून चोख ठेवावे लागले. परिणामी, या भागातील उसाचे एकरी उत्पादन वाढून काटामारी रोखल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे ७७ कोटी ५० लाख रुपयांचा फायदा झाला आहे. आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी ही माहिती दिली.
परिसरातील श्री दत्त, गुरुदत्त, जवाहर, शरद, पंचगंगा व सांगलीतील दत्त इंडिया या कारखान्यांचे गाळप ५० लाख टनांपेक्षा जास्त झाले आहे. २० टनाच्या एका सांगडीला सरासरी १ टन उसाची काटामारी धरली तर एकूण वजनाच्या ५ टक्के काटामारी होते. पन्नास लाख टन उसाचे पाच टक्केने अडीच लाख टन ऊस होतो. साधारणतः ७७ कोटी ५० लाख रुपयांची बचत झाली आहे असा दावा चुडमुंगे यांनी केला. यावेळी आंदोलन अंकुशचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, दत्तात्रय जगदाळे, भूषण गंगावणे, रशीद मुल्ला, बाळासाहेब भोगावे, एकनाथ माने, संभाजी माने उपस्थित होते.