ऊस थकबाकीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन

अंबाला : ऊस बिले मिळणार उशीर झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अंबाला येथील नारायणगढ साखर कारखान्यासमोर अंगावरील शर्ट काढून टाकत अर्धनग्न आंदोलन केले. शेतकऱ्यांनी सांगितले की, ऊस हंगाम या महिन्याच्या सुरुवातीला समाप्त झाला आहे. मात्र, ८० कोटी रुपयांहून अधिक ऊस बिले अद्याप थकीत आहेत. नियमानुसार १४ दिवसांत ऊस बिले शेतकऱ्यांना दिली गेली पाहिजेत. शेतकऱ्यांनी भाजी मंडईसमोर एकत्र येऊन आपल्या मागण्यांबाबत मोर्चा काढला. शेतकऱ्यांनी सांगितले की, या वर्षी त्यांच्या गहू, बटाटे, मोहरी या पिकांचे नुकसान झाले आहे. आता ऊस बिलेही अद्याप मिळालेली नाहीत. आम्ही गेल्या महिनाभरापासून आंदोलन करीत आहोत. मात्र, त्याचा काही उपयोग झालेला नाही.

द ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार,आंदोलनासाठी स्थापन केलेल्या २१ सदस्यांच्या समितीचे अध्यक्ष सिंगरा सिंह यांनी सांगितले की, दरवर्षी शेतकऱ्यांना आंदोलन करून आपले पैसे मिळविण्यासाठी भाग पाडले जाते. ७ एप्रिल रोजी गळीत हंगाम समाप्त झाला आहे. शेतकऱ्यांचे ८० कोटी रुपये थकीत आहेत. शेतकऱ्यांना स्वतःचा संसार चालविण्यासाठी पैशांची गरज आहे. आम्हाला फक्त आश्वासने मिळत आहेत. आता २ मे रोजी अंबाला विभागीय आयुक्तांना भेटण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, नारायणगढ साखर कारखान्याचे कार्यकारी अधिकारी नीरज यांनी सांगतिले की, शेतकरी पूर्ण बिलांची मागणी करत आहेत. मात्र कारखान्याची आर्थिक स्थिती बिकट आहे. कारखान्याने १६५ कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला आहे. या हंगामातील ८४ कोटी रुपये आणि गेल्या हंगामातील ६६ कोटी रुपये दिले आहेत. आगामी काही दिवसांत आणखी २० कोटी रुपये दिले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here