कोल्हापूर : येत्या गळीत हंगामासाठी ऊस दर मागणीकरिता शिवसेनेच्या वतीने तुरंबे (ता. राधानगरी) येथे गुरुवारी (दि.21) ऊस परिषद होणार आहे. दुपारी चार वाजता ही परिषद होईल. यंदाच्या गाळप हंगामातील ऊस दराबरोबर दोन वर्षांच्या थकीत एफआरपी प्रश्नी आंदोंलनाची पुढील दिशा परिषदेत ठरवण्यात येईल, अशी माहिती जिल्हा उपप्रमुख प्रकाश पाटील व संभाजीराव भोकरे यांनी दिली. शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे या परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील. आमदार प्रकाश आबिटकर, ज्येष्ठ शेतकरी नेते मारुतराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांकडे 2018-19 हंगामातील एफआरपीची रक्कम थकीत आहे. उत्पादकांची देणे प्रलंबित असताना दराचा तिढा न सोडवता गाळप हंगामाला सुरुवात केली आहे. कारखाना सुरु करताना सर्वच कारखान्यांचे पदाधिकारी एफआरपीपेक्षा अधिक दर देण्याचे जाहीर करत आहेत. पण रक्कम मात्र कोणीच जाहीर करत नाही. त्यामुळे दर जाहीर केल्याशिवाय कारखाना सुरु करु देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली असल्याचे पाटील व भोकरे यांनी सांगितले. एफआरपी सोबत पावासामुळे शेतीचे झालेले नुकसान, शेतकरी व शेतमजुरांचे निवृत्तिवेतन, पीक विमा व केंद्र सरकारकडून मिळणारे अनुदान आदी बाबींवर परिषदेत चर्चा करुन ठराव करण्यात येणार आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.