पुणे : बांगलादेश ने आयात शुल्कात वाढ करत महाराष्ट्रासह देशातील संत्रा उत्पादकांना मोठा आर्थिक झटका दिला आहे. बांगलादेशने पूर्वीच्या ८८ टका या आयात शुल्कात आता १०१ टका(बांगलादेशी चलन)अशी वाढ केली आहे. आयात शुल्कात वाढ झाल्याने त्याचा संत्रा उत्पादकांच्या आर्थिक उत्पन्नावर नकारात्मक परिणाम होणार आहे.
महाराष्ट्रासह देशातील राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये नागपुरी संत्र्याचे उत्पादन घेतले जाते.पंजाबमध्ये किनो जातीच्या संत्र्याची लागवड आहे. महाराष्ट्रात सुमारे दीड लाख हेक्टरवर संत्रा लागवड असून, त्यातील एक लाख हेक्टर क्षेत्र अमरावती जिल्ह्यात आहे. नागपूर विभागात २५, तर उर्वरित महाराष्ट्रात २५ हजार हेक्टरमध्ये संत्रा उत्पादन घेतले जाते. बांगलादेश हा एकमेव नागपुरी संत्र्याचा आयातदार आहे. मात्र गेल्या तीन वर्षांत बांगलादेशकडून सातत्याने आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे.
‘अग्रोवन’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जिचकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला आयात शुल्क कमी असल्याने निर्यात दोन लाख टनांपेक्षा अधिक होती. उर्वरित संत्रा फळांना देशांतर्गत बाजारपेठेत चांगला दर मिळत होता. त्यानंतरच्या काळात आयात शुल्क २२ टकांवरून ८८ आणि आता १०१ टका करण्यात आले आहे.
बांगलादेशी एक टका भारतीय रुपयांत ७१ पैसे होतो. त्यानुसार आयात शुल्क प्रति किलो ७१ रुपयांवर पोहोचले आहे. याचा परिणाम संत्र्याच्या निर्यातीवर होणार असल्याने उत्पादकांच्या अडचणीत वाढीची शक्यता वर्तविली जात आहे.