नवी दिल्ली : सध्या मक्याची उपलब्धता कमी झाल्याने दरात वाढ होण्याची शक्यता पोल्ट्री उद्योगाने व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनासाठी मक्याचा जास्तीत जास्त वापर करण्याला प्राधान्य दिले आहे. इथेनॉल उत्पादनासाठी अधिक प्रमाणात मका वापरण्याची परवानगी देऊन १५ टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्याचे लक्ष ठेवले आहे. त्याचा परिणाम दिसून येत आहे. ऑक्टोबर २०२३ च्या तुलनेत जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यांत भारतात मक्याच्या दरात २० टक्क्यांनी सुधारणा झाली आहे. मात्र, गरजेइतका मका उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे.
तेल कंपन्यांनी मका आणि इतर धान्यांपासून इथेनॉलची खरेदी किंमत ५.७९ रुपयांनी वाढवून ७१.८६ रुपये प्रती लिटर केली आहे. त्यानंतर उत्पादित मक्यापैकी १० ते २० टक्के मका इथेनॉल उत्पादनाकडे वळवला जाऊ शकतो, परिणामी मागणी-पुरवठ्यातील तफावत वाढू शकते, असा पोल्ट्री उद्योगाचा अंदाज आहे. मक्याचा पुरवठा कमी झाल्यामुळे भाव सध्याच्या २५ रुपये प्रती किलोवरून ३० रुपये प्रती किलोवर जाऊ शकतात. मक्यावर ५०-५५ टक्के आयात शुल्क लावले जाते. सरकारने आयात शुल्क माफ करावे आणि पोल्ट्री उद्योगाला जीएम मका आयातीची परवानगी द्यावी, अशी पोल्ट्री उद्योगाची मागणी आहे.