कोल्हापूर, दि. 20 ऑगस्ट 2018 : साखर उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात यावर्षी ऊस तोड़ मजुरांची टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना यावर्षी ऊस तोड यंत्राची (केन कटर) सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.
यावर्षी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रात पावसाची संततधार थांबत नाही. मराठवाड्यात ही चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे तिथे असणारी शेतीही चांगली पिकली आहे, सध्यातरी तेथील पिके चांगल्या स्थितीत असल्याचा अहवाल कृषी विभागाकडून दिला आहे. याशिवाय बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी येणारे कामगार आता कमी झाले आहेत. नवीन तरुण पिढी नोकरीच्या शोधात मुंबई, पुणे किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये आपले वास्तव्य करत आहेत. त्यामुळे यावर्षी ऊस तोडणी मजुरांची मोठी कमतरता जाणवणार असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच जुन्या ऊसतोड मजुरांना अपेक्षित मजुरी मिळत नाही. त्यामुळे ऊस तोड परवडणारी नसल्याची तक्रार वारंवार होत आहे. साखर कारखानदारीत महत्त्वाचा घटक असलेले ऊसतोडणी मजूर शासकीय लाभापासून कायम दुर्लक्षित राहिला आहे. त्यांचे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक किंवा स्थलांतराचे प्रश्न तीव्र होत आहेत.
महाराष्ट्र राज्यात एक टन ऊस तोडण्यासाठी महिला-पुरुष जोडीला सरासरी 200 रुपये मोबदला मिळतो. एक दिवसात दोघे अडीच ते तीन टनांपर्यंत ऊस तोडतात. त्याचवेळी हार्वेस्टर मशीनला (केन कटर) प्रतिटन ४०० रुपये भाडे द्यावे लागते. यावरून मानवी श्रमापेक्षा यंत्रासाठी अधिक मोबदला दिला जातो, हे स्पष्ट होते. त्याउलट कर्नाटकात मजुराला ३०० रुपये टन मोबदला मिळतो. त्यामुळे ऊसतोड मजुरांना मोबदल्या किंवा रोजंदारी अभावी ऊस तोडी कडे पाठ फिरवत आहेत. या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांनी आतापासूनच ऊसतोड मजुरांच्या उमेदीवर बसण्याऐवजी केन कटरच्या साह्याने ऊस तोडण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज निर्माण झाली आहे.