पुणे : गतवर्षीच्या गाळप हंगामामध्ये तीन हजार रुपयांच्या ऊस दराची कोंडी श्री छत्रपती सहकारी कारखान्यानेच फोडली होती. सध्या ताळेबंद तयार करण्याचे काम सुरू असून जो भाव निघेल तो देण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिले. छत्रपती कारखान्याची वार्षिक सभा घेण्याबाबत शेतकरी कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले, त्या वेळी काटे बोलत होते. यावेळी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, अॅड. संभाजी काटे, दिलीप शिंदे, शिवाजी निंबाळकर, सतीश काटे, विठ्ठल पवार, रामचंद्र निंबाळकर, संतोष चव्हाण, दत्तात्रय ढवण, बाळासाहेब शिंदे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, फायनान्स मॅनेजर हनुमंत करवर व सभासद उपस्थित होते.
काटे म्हणाले, वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास आपण घाबरत नाही. कारखान्याची निवडणूक उच्च न्यायालयाच्या आदेशाने लागली तर अडचण येऊ नये म्हणून मुदतवाढ घेऊन ठेवली आहे. वार्षिक सभा घेणारच आहे. आपण दर कमी घेतो आहे याचा निश्चितपणे ऊहापोह होणे गरजेचे आहे. सुधारणा होणे काळाची गरज आहे. साखर उतारा वाढण्यासाठी ८६,०३२ या उसाची लागण करण्यासाठी सभासदांना प्रोत्साहित केले होते. त्याला सभासदांनी चांगला प्रतिसाद दिला होता. परंतु दोन वर्षात ८००५ या उसाच्या जातीच्या नावाखाली ६२१७५ या उसाच्या जातीची लागवड कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाल्याने साखर उताऱ्याला फटका बसला आहे.
यापुढे ८००५ हा ऊस गाळपासाठी घेतला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील दोन ते अडीच लाख टन चांगल्या प्रतीचा ऊस इतर कारखान्यांना गाळपासाठी जातो, तो ऊस छत्रपती कारखान्याला गाळपासाठी मिळाला तर साखर उतारा वाढल्याशिवाय राहणार नाही. कारखान्याला संचित तोटा आहे, हे सर्वांना माहीत आहे. ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेला पैसे देऊनही गेल्या वर्षी ९० ते ९२ टोळ्यांनी फसवणूक केली. छत्रपती कारखाना जो सभासदांना भाव देतो तोच गेटगेन उसालादेखील देतो, असेही अध्यक्ष प्रशांत काटे यांनी सांगितले.