पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्रात अंदाजे ८ लाख मे. टन ऊस गळितास उपलब्ध आहे. क्षेत्राबाहेरील गेटकेनचा २ लाख मे. टन ऊस गळितास घेऊन १० लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठरविल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिली. शुक्रवारी कारखान्यात मिल रोलरचे पूजन कारखान्याचे अध्यक्ष, काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
काटे म्हणाले कि, येत्या गळीत हंगामाकरिता १० लाख मे. टन ऊस गाळप करण्याच्या दृष्टीने ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा भरती करण्याचे काम चालू आहे. आतापर्यंत ३८६ ट्रॅक्टरचे, १११० बैलगाडीचे व ५६८ ट्रॅक्टरगाडीचे करार पूर्ण झाले आहेत. सध्या कारखान्यातील मशिनरी ओव्हरहॉलिंग व रिपेअरिंगची कामे चालू आहेत. ही कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही प्लॅन्ट गाळपासाठी सज्ज ठेवण्यात येणार आहेत. येत्या हंगामाकरिता असलेली उसाची उपलब्धता विचारात घेता दोन्ही प्लॅन्ट पूर्ण क्षमतेने चालविण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमास संचालक बाळासाहेब पाटील, नारायण कोळेकर, राजेंद्र गावडे, संतोष ढवाण, रसिक सरक, निवृत्ती सोनवणे, कुंदन देवकाते, तसेच माजी संचालक भाऊसाहेब सपकाळ, कार्यकारी संचालक अशोक जाधव, वर्क्स मॅनेजर प्रसाद राक्षे, फायनान्स मॅनेजर हनुमंत करवर, मुख्य शेती अधिकारी जालिंदर शिंदे, सिव्हिल इंजिनिअर तानाजी खराडे, डेप्युटी चीफ इंजिनिअर अण्णासाहेब कदम, सुरक्षा अधिकारी दत्तात्रय पिसे, परचेस ऑफिसर वीरेंद्र वाबळे, शुगर वर्कर्स युनियनचे अध्यक्ष युवराज रणवरे, सतीश गावडे, नंदकुमार चांदगुडे, गजानन कदम, सुहास निंबाळकर उपस्थित होते.