सोलापूर : श्री संत दामाजी कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने मागील दोन हंगामामध्ये चांगले गाळप करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बीले, कामगारांचे पगार, ऊस तोडणी-वाहतूक ठेकेदारांची बीले वेळेत दिली आहेत, असे प्रतिपादन धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी केले. संचालक मंडळाचा चांगला कारभार हीच स्व. किसनलाल मर्दा यांना आदरांजली आहे, असे ते म्हणाले.
श्री संत दामाजी कारखाना कार्यस्थळावर दामाजी कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. किसनलाल मर्दा यांच्या १६ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात धनश्री परिवाराचे मार्गदर्शक प्रा. काळुंगे बोलत होते. स्व. मर्दा व स्व. रतनचंद शहा शेठजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला प्रा. काळुंगे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात, जिजामाता पतसंस्थेचे मार्गदर्शक रामकृष्ण नागणे, यादाप्पा माळी, रमेश मर्दा, सुभाष मर्दा, किशोर मर्दा, प्रकाश मर्दा, श्रीकांत मर्दा, अनिल मर्दा यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
पुण्यतिथीनिमीत्त मारापूर येथील गुरुदत्त भजनी मंडळ, मस्तान मुल्ला, सुभाष शिवशरण, अरुण शिवशरण यांचा भजनाचा कार्यक्रम व पुळूजवाडी येथील तानाजी मदने महाराज, पांडुरंग गवळी महाराज भालेवाडी, नंदकुमार तोंडसे महाराज व फटेवाडीचे दादासाहेब मेटकरी महाराजांच्या भारुडांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे आदी उपस्थित होते.