सोलापूर : दिवंगत कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील यांनी यशवंतराव चव्हाण व खा. शरद पवार यांच्या विचारांतून कमी खर्चात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली. सोलापूर जिल्ह्यात उसाला सातत्याने एक नंबरचा दर दिला. हा आदर्श कायम राखताना उसाला सर्वात जास्त दर देऊ, अशी ग्वाही चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली. कारखाना कार्यस्थळावर संस्थापक चेअरमन कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
चेअरमन पाटील म्हणाले की, यंदा नोंद झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेत गाळप केले जाईल. शेतकऱ्यांनी तुटलेला खोडवा ठेऊन त्याची निडवा म्हणून नोंद द्यावी. पुढील हंगामात २०२४-२५ मध्ये गळीतास येणाऱ्या निडवा उसाला प्रती टन १०० रुपये जादा दर दिला जाईल. यावेळी कर्मवीर अण्णांच्या १०० व्या जयंतीनिमित्त कारखान्यात प्रामाणिकपणे उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या कामगारांचा प्रातिनिधीक स्वरुपात सन्मानचिन्ह व मानधन देऊन गौरव करण्यात आला.
सुरुवातीला बारामती ॲग्रोचे प्रमुख राजेंद्र पवार, रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉ. जे. जी. जाधव, माजी उपसभापती बाळासाहेब पाटील, मधुकर नाईकनवरे, अण्णांचे नातू अभिजीत व रणजित पाटील यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. डॉ. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक प्रा. तुकाराम मस्के यांनी प्रास्ताविक केले. संचालक दिनकर चव्हाण यांनी आभार मानले. माजी संचालक प्रकाश पाटील, सुभाष भोसले, मधुकर नाईकनवरे, सचिन पाटील, रणजित पाटील, प्रा. आप्पासाहेब पाटील, प्रविण भोसले, औदुंबर शिंदे, कांतीलाल गलांडे आदींची भाषणे झाली. व्हा. चेअरमन प्रेमलता रोंगे, प्र. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड आदी उपस्थित होते.