‘श्री अन्नपुर्णा जॅगरी’चे उद्यापासून गाळप बंद : संजयबाबा घाटगे

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊस दर निश्चितसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत श्री अन्नपुर्णा जॅगरी पावडर प्रकल्प दि. ३ नोव्हेंबर रोजी दुपारनंतर बंद ठेवण्याचा निर्णय संचालक मंडळाने व कारखाना प्रशासनाने घेतला आहे. कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी ही माहिती दिली.

माजी आमदार घाटगे म्हणाले की, राजू शेट्टी यांनी ७ नोव्हेंबर रोजी ऊस परिषद घेण्याचे जाहीर केले आहे. त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करण्याकरिता आम्ही आमचा कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून, तुटलेला ऊस व प्रक्रियेत असलेला माल काढून घेऊन शुक्रवारी दुपारनंतर ऊस तोडी व प्रकल्प पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

घाटगे यांनी सांगितले की, सर्व शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस लागवड करावी. पुढील वर्षी उसाला निश्चितच अधिक दर मिळेल, अशी अपेक्षा आहे. यंदा अवर्षणग्रस्त परिस्थिती व काळम्मावाडी धरणाची गळती दुरुस्तीमुळे शेतांना पाणी मिळाले नाही. अनेक ठिकाणी विहिरींनी पाण्याचा तळ गाठला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. त्यामुळे ऊस दराबाबत निर्णयसाठी कारखाना बंद ठेवला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here