श्री दत्त साखर कारखाना क्षारपडमुक्ती शेतीसाठी सहकार्य करणार : चेअरमन गणपतराव पाटील

कोल्हापूर : नापिक जमीन पुन्हा वापरात आणण्यासाठी श्री दत्त साखर कारखान्याच्या क्षारपडमुक्तीचा ‘दत्त पॅटर्न’ राबवला. त्याला मोठे यश मिळाले आहे. आठ हजार एकरावर जमीन क्षारपडमुक्त झाली आहे. शेतकरी साडेतीन हजार एकरामध्ये उत्पादन घेत आहेत. येथील शेतकऱ्यांनीही सामुदायिकरीत्या क्षारपडमुक्तीचा प्रकल्प राबवल्यास सर्व सहकार्य करू, असे आश्वासन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी दिले. कवठेएकंद येथे आयोजित क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रामचंद्र थोरात होते.

गणपतराव पाटील म्हणाले की, उत्पादन करणाऱ्या जमिनीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होऊन अन्न उत्पादन करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे येत आहेत. उपलब्ध असणारी जमीन क्षारपडमुक्त केल्यास ती पुन्हा वापरता येऊ शकते. जादा पाणी, रासायनिक खते, सेंद्रिय कर्बाचा अभाव यामुळे जमिनी नापिक बनत आहेत. ते टाळण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. यावेळी दत्त कारखान्याचे शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी मार्गदर्शन केले. कीर्तिवर्धन मरजे यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी अमृत सागर, प्रा. बाबूराव लगारे यांची भाषणे झाली. विद्यासागर लंगडे यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी पोळ, डॉ. नरेंद्र खाडे, रामचंद्र थोरात आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here