श्री सिध्दीविनायक ग्रीनटेकचा पारदर्शक कारभारावर भर : चेअरमन कुलकर्णी

धाराशिव :खामसवाडी येथील श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक युनिट क्रमांक दोन या गुळ कारखान्याचा गळीत हंगाम २०२४-२५ चा रोलर पूजन रविवारी (दि.१) उत्साहात झाला. सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी रविवारी सपत्निक लक्ष्मीपूजन व रोलर पूजन केले. युनिटमध्ये प्रतिदिन दीड हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती चेअरमन कुलकर्णी यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसह पारदर्शक कारभारावर भर दिला जाणार असल्याचे यावेळी कुलकर्णी यांनी सांगितले.

चेअरमन दत्ताभाऊ कुलकर्णी म्हणाले, ३० जून २०२२ रोजी कारखान्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. मागील वर्षी प्रथम चाचणी घेऊन कारखाना सुरू केला. यावर्षी पूर्ण क्षमतेने गाळप केले जाणार आहे. कारखाना परिसरातील लोकांच्या मनात सिध्दीविनायक परिवाराबद्दल विश्वास आहे. ऊस खरेदीनंतर अवघ्या १५ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातात. मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला अडीच हजार शेतकऱ्यांना आमंत्रित करून कारखान्याची कार्यपद्धती समजावून सांगू. यावेळी खामसवाडीचे सरपंच अमोल पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष अजित पिंगळे आदींची भाषणे झाली. मोहेकर उद्योग समूहाचे अध्यक्ष हनुमंत मडके, बालाजी कोरे, उपसरपंच किरण पाटील, संजय पाटील, दिलीप पाटील, अरुण चौधरी, माणिक बोंदर, सचिन मिनियार, गणेश कामटे, दिनेश कुलकर्णी, राजकुमार जाधव, अरविंद गोरे उपस्थित होते. अॅड. नितीन भोसले यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here