पुणे : पाटेठाण (ता. दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्यामध्ये आगामी, २०२४-२५ या गळीत हंगामातील मिल रोलर पूजन आणि मशिनरीचे पूजन कारखान्याचे कर्मचारी विजयसिंह शेळके आणि त्यांच्या पत्नी प्रमिला शेळके यांच्या हस्ते पडला. यावेळी आगामी गाळप हंगामात कारखान्यास अंदाजे ७ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होणार आहे. गळीत हंगामासाठी कारखाना सज्ज आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या उसाची नोंद कारखान्याकडे करावी, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी केले.
अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी सांगितले की, ऊस गळीत हंगाम ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. हंगामासाठी कारखान्याकडे १० हजार २०० हेक्टर क्षेत्र ऊसाची नोंद झाली आहे. कारखान्याने ४०० टायर बैलगाडी, ३५० ट्रॅक्टर टायरगाडी, २२५ वाहन टोळ्या, ५ हार्वेस्टर अशा ऊस तोडणी यंत्रणेसाठी करार केले आहेत. मोबाईल ॲपद्वारे ऊस लागवडीच्या नोंदी सुरू आहेत. यावेळी संचालक महेश करपे, अनिल बधे, माधव राऊत, किसन शिंदे, भगवान मेमाणे, लक्ष्मण कदम, चंद्रकांत कदम, सीईओ दत्ताराम रासकर, कृषीनाथ ग्रीन एनर्जी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश मते आदी उपस्थित होते.