सोलापूर : येथील सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर धर्मराज काडादी यांनी नवे तंत्रज्ञान वापरून अवघ्या तीन महिन्यांत कारखाना सुरू करून दाखविला आहे. कारखान्याने या पट्ट्यात सर्वाधिक दरही दिला आहे. गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेला चिमणीचा न्यायालयीन लढा जून २०२३ मध्ये संपला. विमानसेवेला चिमणीचा अडथळा असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ती पाडण्यात आली. मात्र, कारखाना सुरू व्हावा यासाठी फ्लू गॅस लाईन टाकण्यात आली आहे. सुमारे दहा कोटी रुपये खर्चून तीन महिन्यात हे काम करण्यात आले.
सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या पाडलेल्या चिमणीपासून जुन्या चिमणीपर्यंतचे अंतर २४० मीटर आहे. बॉयलरमध्ये तयार होणारा फ्लू गॅस वाहून नेण्यासाठी तिथपर्यंत नवी लाईन टाकण्यात आली. बॉयलरमधील फ्लू गॅसचे प्रेशर कायम राहण्यासाठी इंडक्शन फॅन (आयडी) बसविण्यात आले आहेत. कारखान्याने आधुनिक इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर्स (इएसपी) प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्यामुळे ९७ टक्के अँश वेगळी करून या चिमणीतून फक्त धूर सोडला जातो. कारखान्याची गाळप क्षमता प्रती दिन ७,५०० टन असून ३८ मेगावॅटचा सहविजनिर्मिती प्रकल्प आहे. आता वीजनिर्मिती प्रकल्प बगॅसवर चालविला जात आहे. या बदलाला संबंधित सरकारी विभागांची मंजुरी घेतल्याचे काडादी यांनी सांगितले. आता ज्या तंत्रज्ञानावर कारखाना सुरू आहे, ती कायमस्वरूपी व्यवस्था नाही. नव्याने चिमणी उभारणी आवश्यकच आहे असे त्यांनी सांगितले.