सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना प्रशासनाने जुन्या चिमणीच्या सहाय्याने आगामी हंगामात गाळप करण्याचा निर्णय घेतला आहे. विमान उड्डानाला अडथळा ठरत असल्याने मागील महिन्यात सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडण्यात आली आहे. त्यामुळे आता आगामी गळीत हंगामात जुन्या चिमणीच्या आधारे गाळप करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. कारखान्याची विशेष सभा झाली. यावेळी सर्व सभासदांनी काडादींवर विश्वास दाखवून त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला.
कारखान्याचे ज्येष्ठ संचालक धर्मराज काडादी म्हणाले कि, कारखान्याच्या जुन्या चिमणीवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने कारखाना सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच अतिरिक्त उसाच्या प्रश्नावर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही मल्टिस्टेट कारखान्यांशी करार करून येथील अतिरिक्त ऊसही गाळप करू, असे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष पुष्पराज काडादी, उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, दीपक आलुरे, भगवान भोसले, अमोल हिप्परगी, संजीवकुमार पाटील, आनंद तानवडे, सुरेश हसापुरे, इंदुमती आलगोंडा, अंबण्णा भांगे आदी उपस्थित होते.