अहमदपूर : यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे कमी पाऊस झाला आहे. शेतकयांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करून उसाचे उत्पादन घ्यावे. एकरी उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन सिद्धी शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि.चे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव यांनी केले. कारखान्याच्या १२ व्या गाळप हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळाप्रसंगी ते बोलत होते.अविनाश जाधव, प्रगतशील शेतकरी बालाजी गुंडरे, प्रशांत पाटील, व्हाइस प्रेसिडेंट पी. जी. होनराव, जनरल मॅनेजर पिसाळ व खातेप्रमुखांच्या हस्ते गळीत हंगाम प्रारंभ करण्यात आला.
कारखान्याचे व्हा. प्रेसिडेंट होनराव म्हणाले, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अपेक्षेपेक्षा कमी गाळप होण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे उसाची अपेक्षित वाढ झालेली नाही. त्याचा साखर उत्पादनावर परिणाम होणार आहे. कारखान्याचे फॅक्टरी मॅनेजर बी. के. कावलगुडेकर, ऊस विभागाचे जनरल मॅनेजर पी. एल. मिटकर, चिफ फायनान्स ऑफिसर आनंद पाटील, चिफ अकाउंटंट एल. आर. पाटील आदी उपस्थित होते. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पी. एल. मिटकर यांनी आभार मानले.