गाळप हंगाम 2024-25 : ऊस वाहतुकीच्या वाहनांना रिफ्लेक्टरची सक्ती करण्याची आवश्यकता

कोल्हापूर : सध्या राज्यात गळीत हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. गाळप हंगाम काळात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढते. ऊस वाहतूक करणारी वाहने अनेकदा रस्त्यावर उभी असतात व त्याच्या पाठीमागे रिप्लेक्टर नसल्यामुळे रात्रीची पाठीमागून येणारी वाहने थांबलेल्या वाहनांवर आदळतात. यात आतापर्यंत शेकडो लोकांचा बळी गेला आहे. तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आल्याच्या घटनाही घडल्या आहेत. हे अपघात थांबवण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली, बैलगाड्यांना रिफ्लेक्टर हे सक्तीचे करावे, अशी मागणी होत आहे.

बहुतांशी ट्रॅक्टर ट्रॉलींना, बैलगाड्यांना रिफ्लेक्टर बसवलेले नाहीत. काही वाहनांना रेडियम लावले आहे, मात्र ते व्यवस्थित दिसत नाही. रात्रीच्या वेळी अगदी जवळ गेल्यानंतरचही नेमके काय थांबले आहे हे लक्षात येते. असे वाहन अचानक दिसताच पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकाची त्रेधातिरपीट उडते व वाहनावरील ताबा सुटून अपघाताला सामोरे जावे लागते. अनेकवेळा जास्तीत जास्त फेऱ्या कशा होतील? आपला नंबर पुढे कसा लागेल, यासाठी लवकर पोहचण्याच्या नादात ट्रॅक्टर व ट्रॉली पलटी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. ऊस गळीत हंगामात होणारे अपघात रोखण्यासाठी सुरवातीपासूनच वाहतूक विभागाने सतर्क राहून वाहनांची तपासणी केली पाहिजे.

कोल्हापूर शहरात सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत बंदी…

गळीत हंगाम संपेपर्यंत सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे, असे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शुक्रवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. गाळप हंगाम सुरू झाला की, अनेक ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉली आणि उसाने भरलेल्या बैलगाड्या शहराच्या आसपासच्या साखर कारखान्यांमध्ये जाण्यासाठी शहरातील रस्त्यावरून जातात. वाहनांच्या अतिरिक्त भारामुळे शहरातील रस्त्यांवर कोंडी होत असून अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरून वाहनांना प्रवेश बंदी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे म्हणाले, ऊस वाहतूक करणारी अनेक वाहने शहरातून जिल्हाभरातील कारखान्यांकडे जातात. यामुळे गर्दीच्या वेळेत शहरात गर्दी तर होतेच, पण अपघाताची शक्यताही वाढते. वाहतूक सुरळीत व्हावी आणि रस्ता सुरक्षा वाढविण्यासाठी उसाने भरलेल्या वाहनांना शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी त्यांना दिवसा पर्यायी मार्ग वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे नियम ऊसाचा हंगाम संपेपर्यंत लागू राहतील. पोलिसांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असून उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. याशिवाय, ऊस वाहतूकदारांना वाहनांच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर बसवावे लागतील, जेणेकरून इतर रस्ता वापरकर्ते ते दूरवरून पाहू शकतील, असे तनपुरे म्हणाले. विहित मर्यादेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणाऱ्या व लाऊडस्पीकरचा वापर करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here