सांगली : सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी विरुद्ध आमदार जयंत पाटील यांच्यात ऊस दरावरून सुरू झालेला संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. राजारामबापू कारखान्यासमोर आंदोलन केल्याबाबत कारखाना प्रशासनाच्या तक्रारीनंतर राजू शेट्टी यांच्यासह १५० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी फेसबुकवर पोस्ट करून जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे. एफआरपीपेक्षा कमी दर देवून जयंत पाटील, विश्वजीत कदम, अरुण लाड, मानसिंगराव नाईक यांच्या कारखान्यात शेतकऱ्याना नागवलं जात आहे, असा आरोप शेट्टी यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यातील १६ पैकी ४ कारखाने जयंत पाटील यांचे स्वत:चे आहेत. तर मोहनराव शिंदे व विश्वासराव नाईक चिखली व क्रांती कुंडल हे जयंत पाटील यांच्या सहकारी मित्रांचे त्यांच्या इशाऱ्यावर चालतात. विश्वजीत कदम यांचे ४ कारखाने असे ११ कारखाने हे जयंत पाटील व विश्वजीत कदम यांच्याकडे आहेत. सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी पहिली उचल ३१०० रुपये ठरविली आहे. सहा कारखान्यांची उचल एफआरपीप्रमाणे ३२०० पेक्षा जास्त होते. पाच कारखान्यांची उचल एफआरपीनुसार २४५० ते २७०० रुपये आहे. हे पाच कारखाने ३१०० रुपये दर देताना ४०० ते ६५०रुपये प्रती टन जादा देतात. तर उर्वरीत ११ कारखान्यांना एफआरपीपेक्षा १०० रुपये देण्यास का परवडत नाही असा सवाल केला आहे.
राजारामबापू कारखान्याच्या काट्यावर आंदोलन झाल्यावर लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगत राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांवर कारखान्याच्या सचिवांमार्फत गुन्हे दाखल केले गेले. तुमच्या पाताळयंत्री स्वभावाला यातून समाधान मिळणार असेल तर आम्ही जामीनसुध्दा घेत नाही. तुमचं समाधान होईपर्यंत तुरुंगात राहतो, पण शेतकऱ्यांचे पैसे तेवढे बुडवू नका असे शेट्टी यांनी म्हटले आहे.