कोल्हापूर : गेल्यावर्षी गाळप झालेल्या उसाला साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा प्रतिटन जादा ४०० रुपये द्यावेत, अशी मागणी शेतकरी संघटनांनी लावून धरली आहे. त्यामुळे राज्यात यंदाच्या ऊस गळीत हंगामात दरावरून शेतकरी आणि कारखानदारांमध्ये संघर्ष सुरू होण्याची चिन्हे आहेत.
गेल्यावर्षी गळीत हंगामादरम्यान बाजारपेठेतील साखरेचा दर ३००० ते ३१०० रुपये प्रती क्विंटल होते. हंगाम चालू झाल्यानंतर देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये साखरेचा दर वधारला. अनेक कारखान्यांची प्रती क्विंटल ३५०० ते ३८५० रुपये दराने साखर विक्री केली, असे म्हणणे शेतकरी संघटनांचे आहे. या नफ्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही झाला पाहिजे, असा संघटनांचा आग्रह आहे. मागणी मान्य होईपर्यंत यंदाचा गळीत हंगाम सुरू न करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्यावर्षी रिकव्हरीनुसार बहुतांश कारखान्यांनी २८०० ते ३१०० रुपये प्रती टन दर दिला. यातून राज्यातील २१० साखर कारखान्यांनी १० कोटी ५३ लाख टन उसाचे गाळप केलेले आहे. बहुतांश साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दर दिला आहे. चारशे रुपयांची मागणी मान्य झाल्यास सुमारे ४, २१२ कोटी रुपये द्यावे लागतील. या पार्श्वभूमीवर गळीत हंगामात संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.