सिंधुदुर्ग : अती पावसाचा उसाला फटका, उत्पादन घटण्याची शक्यता

सिंधुदुर्ग : यंदा लांबलेल्या पावसामुळे असळज (ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) येथील डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचा ऊस गाळप हंगाम दरवर्षीच्या तुलनेत २५ दिवसांनी विलंबाने सुरू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस तोडणीला तब्बल महिनाभरानंतर प्रारंभ झाला आहे. मात्र यावर्षी ऊस उत्पादनात मोठी तूट येण्याचा प्राथमिक अंदाज आहे. अतिमुसळधार पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याचे मानले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ६,००० टन ऊस तोडणी पूर्ण झाली आहे. ऊसतोडणी करीत असताना ऊस शेतीचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. आतापर्यंत झालेल्या तोडणीवरून जिल्ह्यातील ऊस उत्पादनात मोठी तूट येणार हे स्पष्ट झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक डिसेंबरपासून ऊस तोडणीसाठी तोडणी मजुरांच्या एक-दोन टोळ्या दाखल झाल्या. सध्या उंबर्डे, कासार्डे आणि वैभववाडी विभागांत एकूण २० टोळ्या ऊस तोडणी करीत आहेक. गेल्या दहा दिवसांत ६ हजार टन उसाची तोडणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात सरासरी प्रती हेक्टर ६० टन उत्पादकता आहे. परंतु यावर्षी आतापर्यंत झालेल्या तोडणीवरून प्रती हेक्टर ४० टन उत्पादन मिळत आहे. याबाबत, नापणे ऊस संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. विजय शेटये म्हणाले की, उसाला चांगल्या सूर्यप्रकाशाची गरज भासते. परंतु या वर्षी अतिमुसळधार पावसामुळे ऊसाची वाढ झाली नाही. जाडीदेखील खूप कमी राहिली. अनेकदा पावसाचे पाणी शेतीमध्ये साचून राहते. या सर्वांमुळे उत्पादनात घट शक्य आहे. तर डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे पर्यवेक्षक प्रकाश गुरव म्हणाले की, जिल्ह्यातील कासार्डे, वैभववाडी आणि उंबर्डे विभागात सध्या २० टोळ्या कार्यरत आहेत. आतापर्यंत ६ हजार टन तोडणी झाली असून जानेवारीत टोळ्याची संख्या वाढवून मिळणार आहे.

साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here