सिंधुदुर्ग : जिल्ह्यात यंदा ५८ हजार टन ऊसाचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत दहा हजार टनाने ऊस उत्पादन वाढले आहे. गेल्या तीन-चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी वेळेवर ऊस तोडणी झाल्यामुळे ऊस उत्पादकांत समाधानाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील ९० टक्के ऊस हा असळज (ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) येथील डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्यावर गाळप होतो. कारखान्याचे सिंधुदुर्गातील वैभववाडी आणि कणकवली हे दोन तालुके कार्यक्षेत्र असले तरी उर्वरित जिल्ह्यातील ऊसदेखील गाळपासाठी नेला जातो.
यंदा जिल्ह्यातील ११६० हेक्टरवरील उसाची तोडणी पूर्ण झाली आहे. मागील पाच-सहा वर्षांपासून ऊसतोडणीच्या समस्येमुळे शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल कमी झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र १७०० हेक्टरवरून ११६० हेक्टरपर्यंत घटले आहे. यावर्षी करूळ घाट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे भुईबावडा घाटमार्गे ऊस वाहतूक करण्यात आली. दरम्यान, डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे पर्यवेक्षक बी. जी. शेळके यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ऊस तोडणी पूर्ण झाली असून ५८ हजार टन ऊस जिल्ह्यातून उत्पादित झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत दहा हजार टन ऊस उत्पादन वाढले आहे. यावर्षी कारखान्याने प्रतिटन ३२०० रुपये दर दिला आहे.