नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघ तसेच आफ्रिकी देशानंतर आता दक्षिण-पूर्व आशियातील तीन महत्वपूर्ण व्यापारी भागीदार देश- सिंगापूर, इंडोनेशिया तथा फिलिपाइन्सनेसुद्धा भारत सरकारला गैर बासमती (कच्चे) तांदूळ निर्यातीवर लागू केलेले निर्बंध हटविण्याचा आग्रह केला आहे.
इन्व्हेस्टिंग डॉट कॉम वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, सिंगापूरने भारताकडे १.१० लाख टन तांदूळ पुरवठ्याची मागणी केली आहे. याचवर्षी जून महिन्यात इंडोनेशियन सरकारने भारताकडे १० लाख टन तांदूळ आयात करण्याची योजना जाहीर केली होती. अलनीनोमुळे झालेल्या हवामान बदलांतून तांदूळ उत्पादन घटण्याची आणि दर वाढण्याची शक्यता तेथेही व्यक्त करण्यात आली आहे.
अलिकडील वर्षात फिलिपाइन्सचेही भारतीय तांदळावरील अवलंबीत्व वाढले आहे. त्यामुळे निर्यात निर्बंध हटविण्याची मागणी त्यांनी केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था वर्ल्ड फूड प्रोग्रॅमने (डब्ल्युएफपी) आपल्या मानवी सहाय्य कार्यक्रमासाठी भारताकडे २ लाख टन तांदळाची मागणी केली आहे. जागतिक अन्न सुरक्षा धोक्याच्या स्थितीत आली आहे. जर भारताने तांदूळ निर्यात बंद केली तर परिस्थिती आणखी बिघडू शकते असे त्यांचे म्हणणे आहे.
बांगलादेशनेही भारताकडे तांदळासह इतर कृषी उत्पादनांच्या पुरवठ्याबाबत चर्चा सुरू केली आहे. आफ्रिकेतील देशही तांदू मागणी करत आहेत. मात्र, भारत सरकारने आपली असमर्थता व्यक्त केली आहे. जुलै महिन्यात घाऊक महागाई १५ महिन्यांच्या उच्च स्तरावर आहे. पुढील काही महिन्यात तीन राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे सरकार महागाई रोखण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. सरकारकडील केंद्रीय साठ्यातही फार मोठा साठा शिल्लक नाही. विरोधी पक्षांनीही देशातील वाढत्या महागाईबद्दल जोरदार टीका केली आहे. सिंगापूरच्या फूड एजन्सीने तांदूळ पुरवठ्यासाठी भारताशी चर्चा सुरू असल्याचे म्हटले आहे.