उधमसिंह नगर : उत्तराखंड सरकारने राज्यात बंद पडलेल्या साखर कारखान्यांना पुन्हा सुरू करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातून ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखान्याच्या कामगारांना दिलासा मिळाला आहे. ऊस विकास तथा साखर उद्योग मंत्री स्वामी यतीश्वरानंद यांनी बंद सितारगंज साखर कारखाना सुरू करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका घेतली. त्यांनी जून महिन्यात कारखान्याची पाहणी केली होती. कारखाना पीपीपी तत्त्वावर सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.
अखेर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सितारगंजमध्ये किसान सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या गळीत हंगामाचे उद्घाटन केले. सरकारने हे पाऊल उचलल्याने हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कारखान्याच्या गळीतप्रसंगी सांगितले की, उसाच्या प्रगत वाणासाठी ३५५ रुपये प्रती क्विंटल तर नियमित वाणासाठी ३४५ रुपये प्रती क्विंटल दर दिला जाईल. सितारगंज कारखान्यात वीज, इथेनॉलचे उत्पादन करण्याची सरकारची पुढील योजना असल्याची घोषणा त्यांनी केली.
ऊस विकास मंत्री यतीश्वरानंद यांनी सांगितले की, कारखाना पुन्हा सुरू करण्याचे आपले आश्वासन सरकारने पूर्ण केले आहे. हा कारखाना सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. यासोबतच अनेकांना रोजगाराच्या नव्या संधी मिळतील. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे काम करीत आहेत.