नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी पहिल्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत उद्योगांतील प्रमुख आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली. बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये पायाभूत क्षेत्र आणि हवामान बदलाच्या मुद्द्यावर भर देण्यात आला. अर्थमंत्री सीतारामन यांच्यासह इन्फ्रा आणि पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. अर्थ मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी पंकज चौधरी, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, वित्त सचिव टी. व्ही. सोमनाथन, आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव, डीआयपीएएमचे सचिव यांसह मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन हेही बैठकीत उपस्थित होते.
एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, अर्थमंत्री सीतारामन यांनी हवामान बदलाच्या मुद्द्यावर चर्चा केली. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प पर्यावरणपूरक असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या अर्थसंकल्पात सरकारने पायाभूत क्षेत्रावर भर दिला. पायाभूत क्षेत्राच्या ताकदीमुळे लाखो रोजगार निर्माण होतील, त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे सरकारला वाटते. पायाभूत प्रकल्पांना निधी देण्यासाठी सरकारने मुद्रीकरण योजनाही सुरू केली आहे. या क्षेत्राला गती देण्यासाठी उद्योगपती आणि पायाभूत क्षेत्राशी निगडित तज्ञांशी बैठकीत चर्चा करण्यात आली. अर्थ मंत्रालयाने याबाबत ट्विट केले आहे. आगामी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पासाठी सूचना मांडण्यात आल्या असे आपल्या ट्विटमध्ये, अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, पुढील बैठका वित्तीय क्षेत्र आणि भांडवली बाजाराचे प्रतिनिधी यांच्यासोबत होणार आहेत. यानंतर, सेवा क्षेत्र आणि व्यावसायिक संस्थांचे प्रतिनिधी, आरोग्य, शिक्षण, पाणी आणि स्वच्छता यासह सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या बैठका होतील. सीतारामन २८ नोव्हेंबर रोजी कामगार संघटना आणि अर्थतज्ज्ञांच्या प्रतिनिधींसोबत अर्थसंकल्पपूर्व बैठक घेणार आहेत असे सूत्रांनी सांगितले.